संगणक आणि भ्रमणध्वनीवर चालणारे, देवनागरीत लिहिलेला मराठी शब्द बरोबर आहे की नाही हे सांगणारे ‘शब्दलेखन’ हे उपयोजन आहे. याचे निर्माते/प्रवर्तक कल्याण जोशी आणि मनोहर राजर्षि यांनी सुरुवातीला उपलब्ध पुस्तकांचा आधार घेऊन मराठी व्याकरणाचा अभ्यास केला. संगणकाला व्याकरण शिकवण्याचे आव्हान पेलताना शब्दकोशांचाही उपयोग झाला. नामांचे सामान्यरूप सिद्ध करताना तिन्ही लिंगातील नामांचे मिळून किमान साठ प्रकार असावेत, असे लक्षात आले. विशेषणांची वर्गवारी, सकर्मक-अकर्मक धातू, धातुसाधित नामे व विशेषणे अशा रूपांची व्यवस्था लावली. याशिवाय प्रत्येक नियमाला असणारे अपवाद, तज्ज्ञांमध्ये काही शब्दांबाबत असलेले मतभेद, जोडशब्दांचे सामान्यरूप इत्यादि प्रत्येक मुद्दा स्वतंत्रपणे, पुष्कळ वेळ देऊन हाताळावा लागला. या आज्ञावलीची तपासणी करण्यासाठी सांख्यिकी पद्धतींचा वापर केला. संगणकाबरोबरच भ्रमणध्वनीवरही हे उपयोजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. हे करताना आलेले रोचक अनुभव, अडचणींवर केलेली मात यांचा आढावा घेणारी ‘शब्दलेखन’ या उपयोजनाच्या यशस्वी निर्मितीची गाथा निर्मात्यांच्याच शब्दात…

